Delhi Election : आनंद गगणात मावेना! तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत फुललं ‘कमळ’; कार्यकर्त्यांकडून जंगी सेलिब्रेशन

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भाजप सरकार तब्बल २७ वर्षांनंतर सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. हळूहळू दिल्लीतील विविध जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. यामुळे भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीची निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत असून कार्यकर्त्यांकडून जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सामील झाले. दिल्लीत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. हा आमचा आणि दिल्लीच्या जनतेचा मोठा विजय आहे, असे वरिंद्र सचदेवा यांनी सांगितले
लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. महिलांना २५०० रुपये देणे, भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणे, यमुना रिव्हरफ्रंट, प्रदूषण कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे याला आमचे प्राधान्य असेल. सर्वांना अभिमान वाटेल असे काम आम्ही करून दाखवू, अशी ग्वाही भाजपचे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे प्ररवेश वर्मा यांनी दिली.





