Hanuman Flag : कर्नाटकमध्ये १०८ फूट उंच ‘हनुमान ध्वज’ हटवण्यावरून वाद; “सिद्धरामय्या हिंदु विरोधी” म्हणत भाजपकडून टीका

Hanuman Flag : कर्नाटकातील मंड्या येथील केरागोडू गावात पोलीस अधिकाऱ्यांनी 108 फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याची घटना समोर आली मात्र त्यानंतर याठिकाणी मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी लावलेला झेंडा उतरवण्यासाठी पोलिस आले असता जमावाने त्यांना अडवले. आंदोलकांमध्ये भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यामुळे आता याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मागच्या आठवड्यात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन हा हनुमान ध्वज फडकावला होता. नंतर त्याविरोधात तक्रारी दाखल आल्याने प्रशासनाने हा ध्वज हटवण्याचे आदेश पोलिसांना दिले. प्रशासनाच्या या आदेशामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवली. परंतु, रविवारी झेंडा काढण्यासाठी पोलीस आल्याने प्रकरण तापले.
संतप्त लोकांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार रवी कुमार यांचे बॅनर फोडले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रशासनाने गावात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने जमावाला रोखण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी खांबावरून हनुमान ध्वज काढून तेथे तिरंगा लावला. त्याचवेळी गावात कलम 144 लागू करण्यात आले.
याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, जिथे तिरंगा फडकवला जातो तिथे भगवा ध्वज फडकवणे नियमांच्या विरोधात आहे. राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी घेण्यात आली होती, मात्र त्याठिकाणी दुसरा ध्वज फडकवण्यात आला. आम्ही मंदिराजवळ हनुमान ध्वज लावण्यासाठी तयार आहोत. आम्ही पण रामभक्त आहोत.
या प्रकरणावर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. यामागे राजकारण असू शकते, असे ते म्हणाले. मला माहीत नाही यामागे कोण आहे? हा देश लोकशाही आणि संविधानाच्या अंतर्गत चालतो.
याबाबत माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष म्हणाले की, परवानगी पत्र लिहिताना खांबाचा वापर धार्मिक कामासाठीही होणार असल्याचे नमूद केले होते. या वादाचे वास्तव मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली आहे. आता भाजपच्या नेत्यांनी यासंदर्भात कर्नाटकातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.





