वाशेरे ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी हंडा मोर्चा

महिला त्रस्त : मुबलक पाणीसाठा असूनही नळाला पाणी येईना
राजगुरूनगर(प्रतिनिधी) – वाशेरे (ता. खेड) येथील पाणी योजनेचे पाणी मिळत नाही ते तात्काळ मिळावे. या मागणीसाठी आज (दि. 6) गावातील महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.
वाशेरे येथे यावर्षी मोठा पाऊस पडल्याने गावाला वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना भरपूर पाणी आहे. कडलगवाडी, तरडेवाडी, देशमुखवाडी, भोतेवाडी, पाटेवाडी करवंदेवस्ती व वाशेरे गावठाणमध्ये नळ पाणी पुरवठा योजना आहे. ही योजना चांगल्या स्थितीत आहे; मात्र काही महिन्यांपासून या वाड्यावस्त्यांचा पाणी पुरवठा बंद आहे. येथील पाणी योजना बंद केल्याने महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. याबाबत ग्रामसभेत नागरिक महिलांनी मागणी करूनही नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळत नाही. आज येथील ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
याबाबत सरपंच संभाजी कुडेकर यांनी सांगितले की, वाशेरेच्या वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या मोटारीची केबल काही अज्ञात व्यक्तींकडून नेहमीच कापली जात आहे. वीज डीपी नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करताना अडचण येत आहे. आम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रान्स्फार्मर नादुरुस्त होते त्यांची अनेकदा दुरुस्ती करूनही ते पुन्हा नादुरुत होत असल्याने पाणी पुरवठा होत नाही. पाणी मिळावे ही ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आहेत.
काही वाड्या उंचीवर असल्याने त्यांना पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. पाणी तिथंपर्यंत पोहचत नाही. पाइपलाइन फुटते अशा अनेक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. येत्या 10 तारखेपर्यंत कडलगवाडी व वाशेरे गावठाणाला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-संभाजी कुडेकर, सरपंच वाशेरे





