Hamas – हमासने आठ जणांना देशद्रोही आणि इस्रायल समर्थक ठरवत रस्त्यावरच गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्वांना डोळ्यांवर पट्टी बांधून गुडघ्यांवर बसवण्यात आलं होतं. हमासने या गोळीबाराचा व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला असून, या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. फिलिस्तिनी अथॉरिटी (PA) ने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. गाझामध्ये कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय मृत्युदंड देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. गाझातील बिघडलेल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी योग्य आणि कायदेशीर नेतृत्वाची गरज आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा हमास आणि इस्रायल यांच्यात तात्पुरता युद्धविराम सुरू होता. गाझामध्ये हमासची पोलिस यंत्रणा पुन्हा सक्रिय : इस्रायली सैन्य गाझा शहरातून परत गेल्यानंतर हमासची पोलिस यंत्रणा पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी इस्रायलच्या तुरुंगांतून सोडण्यात आलेल्या काही कैद्यांना गाझामध्ये आणण्यात आलं. त्या वेळी हमासच्या ‘अल-कासम ब्रिगेड’चे जवान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्याच वेळी हमासने अशा काही कुटुंबे आणि स्थानिक गटांविरुद्ध मोहीम हाती घेतली, ज्यांच्यावर इस्रायलशी संबंध असल्याचा संशय आहे. गाझातील एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की, शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र चकमकी सुरू आहेत. हमास अशा लोकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, जे पॅलेस्टाईनविरोधी हालचालींमध्ये सहभागी आहेत. दुसरे रहिवासी मोहम्मद यांनी सांगितले की, शुजाइया भागात हमास सुरक्षा दल आणि ‘हिलेस’ नावाच्या प्रभावशाली कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणावर चकमक झाली. हे क्षेत्र इस्रायलच्या सीमेजवळ असल्याने तणाव अधिक वाढला आहे. मोहम्मद यांनी सांगितले की, त्यांनी गोळीबाराचे आवाज ऐकले आणि हमासच्या कारवाईचे समर्थन केले. इस्रायली पंतप्रधानांची प्रतिक्रिया : गाझातील अस्थिरतेदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या भूमिकेचा उल्लेख करत सांगितले की, “गाझामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी हमासने प्रथम आपली सर्व शस्त्रे सोडली पाहिजेत, शस्त्रनिर्मिती कारखाने बंद केले पाहिजेत आणि शस्त्रांची तस्करी पूर्णतः थांबवली पाहिजे.”