जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 23 हजार 922 इतके मतदार आहेत. यात तरुण मतदारांची संख्या 5889 तर पहिल्यांदा मतदान करणार्यांची संख्या 4899 आहे. बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) होणार्या विधानसभा निवडणूक मतदानाकरिता 356 मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदर्श आचार संहिता अंमलबजावणी तालुक्यामध्ये सुरू झाल्याची माहिती जुन्नर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली. जुन्नर पंचायत समिती सभागृहात विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी तहसीलदार डॉ. सुनिल शेळके, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केशव जाधव, अनंता गवारी आदी उपस्थित होते. जुन्नर पंचायत समिती कार्यालयात मंगळवार (दि. 22) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर शनिवारी (दि. 23 नोव्हेंबर) लेण्याद्री गणपती देवस्थान सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. जुन्नर पंचायत समिती कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळणार आहे. निवडणूक काळातील सर्व जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. सी वोटर अॅपवर दाखल तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती पल्लवी घाटगे यांनी यावेळी दिली. रवींद्र चौधर म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत आशा पोस्ट ब्लॉक केल्या जाणार असून नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून समाजकंटकांवर योग्य ती कारवाई केलीय जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील परवानाधारक शस्त्र धारकांनी आपली शस्त्रे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा या पोलीस ठाण्यात तातडीने जमा करावीत तसेच या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंद्यांवर सक्तीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महिला मतदार : 1 लाख 59 हजार 322 पुरुष मतदार : 1 लाख 64 हजार 594 इतर : 6 एकूण : 3 लाख 23 हजार 922 उमेदवारी अर्ज मंगळवार (दि. 29) पर्यंत दाखल करण्यात येणार आहे. या दिवसापर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करता येणार असून ही पुरवणी यादी म्हणून त्याची नोंद होणार आहे. याचाही लाभ नावनोंदणी न केलेल्या मतदारांनी घ्यावा. – सुनील शेळके, तहसीलदार