Hadapsar : सातवीत शिकणाऱ्या समर्थचा कालव्यात बुडून दुर्देवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, तिसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह

Pune News | पुण्यातील हडपसर येथील सातववाडी येथे मुळा मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका सातवीत शिकणाऱ्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी मित्रांसोबत हा मुलगा पोहवण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो पाण्यात वाहून गेला. यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृत्यदेह आढळून आला.
या मृतदेहाची ओळख पटली असून समर्थ अमोल यादव (वय १३, रा. सर्वे नंबर ८, महात्मा फुलेनगर, सातववाडी, हडपसर) असे मयत मुलाचे नाव आहे. तिसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यूदेह आढळून आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात देखील शोककळा पसरली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ हा साधना विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शनिवारी सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. पाणी हे वाहते असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला.
त्याच्या सोबतीच्या मित्रांनी समर्थ दिसत नसल्याने आरडाओरडा सुरू केला. तेथील स्थानिक नागरिकांनी त्याचा पाण्यात शोध घेण्यासाठी उड्या मारल्या. पण तो सापडला नाही. त्यानंतर अग्निशमल दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समर्थ सापडला नाही. अखेर दोन दिवसांनी त्याचा शोध लागला.
तिसऱ्या दिवशी यवत जवळील बोरी आंदी येथे कालव्यात सकाळी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत आल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख पटवून यवत पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून मृतदेह ताब्यात दिला आहे. समर्थच्या अशा अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




