हडपसर: मतदान उत्साहात, काही ठिकाणी गोंधळ

हडपसर – शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील ५३२ मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्साहात मतदान केले. येथे नवमतदारांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मतदान करत असल्याचा, तर वयाची ऐंशी पार केलेल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर अजूनही मतदानाचा हक्क बजावत असल्याचा आनंद दिसून आला.
गाडीतळ येथील बंटर स्कूलमधील मतदान केंद्रावर पैसे वाटपाच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. अनेक केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरसाठी ताटकळावे लागले. मांजरी, केशवनगर, साडे सतरानळी, मुंढवा, मगरपट्टा, ससाणेनगर, रामटेकडी, गोंधळेनगर सातववाडी, काळेपडळ, महंमदवाडी, तरवडे वस्ती परिसरातही शांततेत मतदान झाले. कोंढवा-मिठानगर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळी साडेआठ – नऊ वाजल्यापासून दुपारपर्यंत मतदानासाठी गर्दी झाली होती.
कोणार्क पुरम सोसायटीतील १७५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गोंधळ निर्माण झाला होता. मतदार यादीतून नावे वगळली असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या. तर, मतदानासाठी आलेल्या काही नागरिकांचे अगोदरच मतदान झाल्याने खऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. दुपारनंतर या भागात मतदारांची संख्या कमी झाली.
लेडी हलिमा बेगम उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने मतदारांना केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. केंद्राबाहेर वाहने अस्ताव्यस्त पार्क झाल्याने अनेकांची वाहने अडकून पडली होती. एसआरपीएफ मधील मतदान केंद्रात शिस्तीत मतदान झाल्याचे दिसून येत होते. त्याचवेळी दुपारचे जेवण मिळण्यास उशीर झाल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
ससाणेनगर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रावर लांब रांगा लागल्याने मतदानास उशीर होत होता. त्यामुळे मतदारांना उन्हात उभे राहावे लागले. उन्हाने वैतागलेल्या काही मतदारांनी त्यामुळे मतदानाकडे पाठ फिरवली. मगरपट्ट्यातील विद्या प्रतिष्ठान मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची रांगोळी काढून व कमान उभारून सजावट करण्यात आली. मतदारांनी सेल्फी पॉइंट येथे मोबाइलमध्ये छायाचित्र घेतले.
वेळ आणि मतदानाचा टक्का
स. ७ ते ९.०० – ४.४५
स. ९ ते ११.०० – ११.४६
स. ११ ते १.०० – २४.१५
दु. १ ते ३.०० – ३३.७८
दु. ३ ते ५ – ४५.००
सायं. ६ – ५०.११





