ज्ञानदीप लावू जगी: ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे
Updated On:

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ।।
माऊली हरिपाठातील चौथ्या अभंगातील शेवटच्या चरणात हरिनामाचा महिमा वर्णन करतात. हरिनामाचा जप केल्याने मागे लागलेला संसार तुटेल, प्रपंचाचे धरणे तुटणे म्हणजेच मोक्ष. हा मोक्ष हरिनामाने सहजरित्या सिद्ध होतो.
तुकोबाराय देखील म्हणतात की, हरिनामाचा जप केल्याने माया तुटते. हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटतील ।। तुकोबाराय आणखी एका ठिकाणी म्हणतात, नाशिवंत देह नासेल हा जाणा । कारे उच्चाराना वाचे नाम ।। नामेंचि तारिले कोट्यान हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविलें ।।
अहो जनहो हा देह नाशिवंत असून तो एक दिवस नष्ट होणार आहे, हे माहीत असूनसुद्धा तुम्ही वाणीने श्रीहरीच्या नामाचा उच्चार का करत नाहीत? आजपर्यंत नामस्मरणाने कोट्यवधी जीवांना तारले आहे आणि कित्येकांना तर वैकुंठाचा लाभ झाला आहे.





