ज्ञानदीप लावू जगी : भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति।
Updated On:

ह.भ.प. संतोष महाराज शास्त्री
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति। बळेवीण शक्ती बोलूं नये।। हरिपाठाच्या चौथ्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, जन्ममृत्युरूपी संसार दुःखापासून एक हरिच सोडविणारा आहे. भगवंताच्या ठिकाणी भाव असल्यावाचून भक्ती होईल व भक्तीवाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात, त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय.
म्हणून तसे बोलू नये. देव लवकर प्रसन्न कसा होईल, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे की, काही एक व्यर्थ शीण न करता आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढताणीतून सोडवावे आणि निजबोधाने शांत राहावे. हरिचे भजन केल्याने काय होईल तर हा जन्ममरणरूप संसार तुमच्यामागे कायमचा लागला आहे त्याच्यातून तुमची सुटका होईल.





