nagar | शिर्डीत सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त !

शिर्डी, (प्रतिनिधी) – शिर्डीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही पानटपरीवर अचानक टाकलेल्या धाडीत दोन आरोपींना जेरबंद करत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुगंधी तंबाखू, विमल आणि इतर कंपनीच्या गुटख्याचा समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत फहाद ताहीरहसन अन्सारी व शोयब ताहीरहसन अन्सारी हे दोन भाऊ गुटखा तस्करी करताना पकडले. हे जरी शिर्डीत वास्तव्यास असले तरी हे मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत यांचा हस्तक निकुंज केसरिया हा राजकोट (राजस्थान) येथून शिर्डीचे गुटख्याचे सूत्र हलवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
शिर्डी शहरात पुन्हा एकदा परप्रांतीय गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा आहे हे अधोरेखित झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कारवाई करतात तर शिर्डी पोलीस स्टेशनला आजपर्यंत गुटखा तस्करी, विक्री होत आहे हे का समजलं नाही, अशीच चर्चा स्थानिक नागरिक करत आहे.
शिर्डीत गुटखा विक्रीचे जाळे खूप मोठं असून यामध्ये अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अनेकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं आहे. तरीसुद्धा शिर्डीतील गुटखाकिंग हे परराज्यातील व्यापाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा करत आहेत, ही गंभीर बाब आहे.
शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानी अनेक चौकाचौकांत, साई कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मंदिर परिसर बाहेर, बसस्टँड, रेल्वेस्टेशन, रस्ते, भिंती इत्यादी ठिकाणी गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या आजही या घटनेच्या साक्षीदार आहेत. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा ढिसाळ कारभार आणि दुर्लक्ष यामुळे शिर्डीतील गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे तरुण, परप्रांतीय हे बेकायदेशीर दारू विक्री, गांजा, गुटखा, अंमली पदार्थ विक्री खुलेआम करत आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिक दहशतीखाली वावरत आहे. कारण या विरोधात आवाज उठवला तर हेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकट गाठून मारहाण करतील. या भीतीने कोणीही पुढे येत नाही, हेच आजचे शिर्डीतील खरे वास्तव आहे.
शिर्डीत बारा महिने अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होताना दिसते. पोलीस मात्र तुरळक एखादी किंवा दुसरी कारवाई करतात. यावर कायमचाच पायबंद का नाही ? परिसरातील गुटखाकिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही. सुरेश आरने, मा. नगरसेवक शिर्डी.





