Gutkha Ban: सोमेश्वरनगर परिसरात माव्याची खुलेआम विक्री; राज्यात गुटखाबंदी फक्त कागदावरच?
Gutkha Ban: सोमेश्वर, वानेवाडी आणि मुरूम परिसरातील पानटपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची उघड विक्री; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.

Gutkha Ban – राज्यात गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात तंबाखूजन्य मावा, सुपारी आणि तत्सम पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. सोमेश्वर, वानेवाडी, मुरूमसह परिसरातील अनेक पानटपऱ्या व किरकोळ दुकानांमध्ये हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातही त्यांची विक्री सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पडताळणी न करता अल्पवयीन मुलांनाही मावा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांचे नियमित सेवन केल्यास तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे विकार तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. गुटखाबंदीचा मुख्य उद्देश नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हा असला तरी माव्याच्या वाढत्या बेकायदेशीर विक्रीमुळे शासनाच्या निर्णयालाच हरताळ फासला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सोमेश्वर, वानेवाडी व मुरूम परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेले परप्रांतीय कामगारही मावा आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे दिसून येते. सेवनानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुकानांची नियमित तपासणी करून बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी, तसेच अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
संयुक्त मोहीम राबवावी
“अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तातडीने रोखावी. अल्पवयीन मुलांना मावा व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.”




