PCMC News: महापालिकेची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर? नगरसचिवाच्या घोळाने प्रशासन गॅसवर
PCMC News: कायदेशीर पेच

PCMC News: नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा व त्यामध्ये झालेले विषय बेकायदेशीर आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला महापालिकेचे नगरसचिव आणि कंत्राटी नगरसचिवाचा सुरू असलेला गोंधळ कारणीभूत आहे.
विषय पत्रावर एका नगरसचिवाची सही तर सभेच्या पीठासनावर वेगळाच नगरसचिव असा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सभेत झालेले विषय कायदेशीर आहेत का? असा पेच प्रशासनाला पडला आहे.
महापालिकेचे नगरसचिव म्हणून मुकेश कोळप काम पाहत होते. मात्र, महापौर रवि लांडगे यांच्या आग्रहाखातर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंत्राटी पद्धतीने नगरसचिव भरण्याची जाहिरात काढली. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवृत्त नगरसचिव व अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांना कंत्राटी नगरसचिव पदावर बसविण्यात आले.
तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले. त्यानंतर मुकेश कोळप यांना ग क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला. जाग आलेल्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला.
कंत्राटी पद असताना त्यांना प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार कसे द्यायचे हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये देखील कोळप यांनीच काम करण्याचे आदेश बारणे यांनी दिले. त्यानुसार मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीचे कामकाज मुकेश कोळप यांनी पाहिले तर त्यासाठीच्या विषयपत्रावर उल्हास जगताप यांच्या सह्या होत्या. PCMC News
त्यानंतर सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज देखील कोळप यांनी बघितले. मात्र, विषयपत्र उल्हास जगताप यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले होते. आता कोळप यांनी काम बघितले असले तरी त्या पदावर यापूर्वीच उल्हास जगताप यांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे.
तसेच आदेश देखील त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे जगताप नगरसचिव असताना कोळप यांनी काम केल्याने सभा बेकायदेशीर झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत कोणी न्यायालयात दाद मागितल्यास प्रशासनासमोर कायदेशीर पेच उभा राहणार आहे. PCMC News
‘नगरसचिव मुकेश कोळप यांनी सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहिले आहे. कंत्राटी नगरसचिव उल्हास जगताप हे त्यादिवशी सुट्टीवर होते.’- मनोज लोणकर, सह आयुक्त.
PCMC News : साहेब… तुम्ही आता तुकाराम मुंडे व्हा; नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांचा समाचार





