पेरिविंकलच्या सूस शाखेत गुरुपौर्णिमा उत्साहात

सूस – चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल सूस शाखेत सोमवारी (दि. ३) आध्यात्मिक गुरु पंकज महाराज गावडे यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वाट दाखविणारे गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करतात.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सुसच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेतील विद्यार्थी गुरूजनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सुक होते. कार्यक्रमाची सुरुवातच “गुरु माझा” या गाण्याने स्वागत करून करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी व सर्व गुरूंना शिक्षकांनी “भेटला विठ्ठल माझा ….” या गाण्यावर मानवंदना केली. सरस्वती पूजन व व्यास ऋशीच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी गुरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कीर्तनकार, आध्यात्मिक वक्ते ह. भ. प. पंकज गावडे महाराज, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणेरी पगडी, शाल, नारळ व पुष्पगुच्छ व महाराजांची प्रतिमा देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थ्याच्या गुरुगीताने करण्यात आली. इयत्ता 9वीतील तन्मय साळुंखे चौधरी व 10 वी तील स्वरा चौधरी या विद्यार्थ्यांनी गुरुविषयी माहिती देऊन गुरूंचे महत्व स्पष्ट केले. गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व गूरूजन- शिक्षकांचा शाल श्रीफळ, गुलाब अत्तर व विद्यार्थ्यानी बनवलेले भेटकार्ड देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व विद्यार्थी शिष्यांसमोर गूरूजनांच्या हस्ते सन्मान मिळणे हीच खरी गुरुदक्षिणा असे प्रतिपादन करून गुरूंचे महत्व पटवून गुरूच्या आज्ञेचे पालन करून निशंक मनाने काम केल्यास प्रगतीच होते व गुरुबळ म्हणजे काय याची प्रचिती येते असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच आपली संस्कृती जपून गुरुपौर्णिमा शाळेत साजरी करून खरंच पेरिविंकल आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करते याची प्रचिती आली असे सांगून गुरु का करावा, कोणाला करावे, गुरूचे जीवनातील महत्व, अशा अनेक पैलुंवर गाथा उलगडत आजची काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यानी कसे वागावे व आजच्या या आधुनिक जगात फोन, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाला बळी न पडता आई-वडील व शिक्षक यांच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचा अनमोल संदेश पंकज महाराजांनी सर्व विद्यार्थ्यांना देऊन सर्वांना त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध केले. सर्वांचे आभार मानून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यकमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक शुभा कुलकर्णी , सचिन खोडके, माधुरी धावडे, सन्मती चौगुले यांसह सर्व शिक्षकवृंदांच्या सहकार्याने आनंदात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील यांनी केले. आज या पावन दिनी पंकज महाराजांच्या आगमनाने शाळेचा सर्व परिसर गूरूमय होऊन दुमदुमला.







