Pune District : पेरिविंकलच्या सूस शाखेचे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत यश

पिरंगुट : सूस (ता. मुळशी) येथील पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. शहरातील 30 नामांकित शाळांमधून सूस शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम पाच क्रमांकांमधून तिसर्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा – 2024 मध्ये या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साकारलेली दगडूशेठ मंदिराची हुबेहुब प्रतिकृती, त्यातील कलात्मक बारकावे, समर्पणभाव, नेपथ्य आणि सौंदर्यीकरण यांनी उपस्थितांचे आणि परीक्षकांचे मन जिंकले.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, चेतनानंद महाराज पुणेकर व आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते प्राचार्या निर्मल पंडित मॅडम यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी समवेत मार्गदर्शक शिक्षक शिवराज कदम, सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव, नेहा मालवदे व कृष्णा अंभूरे आदी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती साकारली नाही, तर त्यामागील अध्यात्मिकता व भक्तिभाव देखील उभा केला. अभ्यासून साकारताना विद्यार्थी एकात्मतेने काम करत होते.
हे अनुभव शिक्षणापलीकडचं खूप काही शिकवणारे आहे. पेरिविंकल स्कूल सूस शाखेचा हा गौरव, शिक्षणासोबतच मूल्यसंस्कार, कला व सामाजिक सहभाग यांचा उत्तम संगम अधोरेखित करतो असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी केले.





