Gurnoor Brar Wickets : कोण आहे गुरनूर ब्रार? ज्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेऊन मोडलं इंग्लंडचं कंबरडं!, पाहा VIDEO
Gurnoor Brar Wickets : सामन्याच्या सुरुवातीला सडकून मार खाणाऱ्या या युवा गोलंदाजाने नंतर असा काही चमत्कार केला की, एकाच षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

Gurnoor Brar Two Wickets In One Over IND vs ENG 1st ODI Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील मानहानिकारक पराभवानंतर आजपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या पहिल्या सामन्यात टॉस दरम्यान भारतीय कर्णधार शुबमन गिलने वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला प्लेइंग ११ मध्ये संधी देत सर्वांना चकित केले. सामन्याच्या सुरुवातीला सडकून मार खाणाऱ्या या युवा गोलंदाजाने नंतर असा काही चमत्कार केला की, एकाच षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
सुरुवातीला गुरनूर ब्रारची झाली धुलाई –
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर बेन डकेट आणि जॅकब बेथेल यांच्या माध्यमातून सावध सुरुवात केली. जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णा यांनी सुरुवातीला नियंत्रित गोलंदाजी केली. ७ षटकांत इंग्लंडच्या बिनबाद २० धावा असताना गिलने आठवे षटक गुरनूर ब्रारच्या हाती सोपवले. या षटकात बेन डकेटने १ चौकार आणि २ षटकार खेचत तब्बल १६ धावा वसूल केल्या. यानंतरच्या पुढच्या षटकातही ब्रारने १० धावा दिल्या. पहिल्या दोन षटकांत २६ धावा दिल्यानंतर भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते.
१३ व्या षटकात ब्रारचा ‘रुद्र’ अवतार; बुमराहचाही तडाखा!
The X-Factor of Team India.. Gurnoor Brar! 💪🏻
pic.twitter.com/kDOUgfoCrI— OneCricket (@OneCricketApp) July 14, 2026
पहिल्या दोन ओव्हर्समध्ये धुलाई झाल्यानंतर बरारने १३ व्या षटकात सामन्याचे चित्र पालटले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने आधी स्थिरावलेल्या जेकब बेथेलला (१४ धावा) बाद केले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर धोकादायक ठरणाऱ्या बेन डकेटला (४३ धावा) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एकाच षटकात लागोपाठ दोन धक्के बसल्याने इंग्लंड बॅकफूटवर आली. या धक्क्यातून इंग्लंड सावरत नाही तोच जसप्रीत बुमराहने कर्णधार हैरी ब्रुकला बाद करून भारताला तिसरे मोठे यश मिळवून दिले.
६ फूट ५ इंचाचा पंजाबचा ‘स्टार’!
Gurnoor Brar sendoff to Duckett. 🥶🔥 pic.twitter.com/1NPY821hPv
— LUCK7773 (@Luck_7773) July 14, 2026
पंजाबच्या मुक्तसर येथे जन्मलेला २६ वर्षीय गुरनूर बरार आपल्या ६ फूट ५ इंच (१९६ सेंमी) या अवाढव्य उंचीसाठी ओळखला जातो. उजव्या हाताने १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या ब्रारला त्याच्या उंचीमुळे खेळपट्टीवरून अतिरिक्त बाऊन्स मिळतो. २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून प्रवास सुरू करणाऱ्या बरारने २०२२ मध्ये पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सचा भाग राहिलेल्या गुरनूरने देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले असून, तो आता वनडेमध्ये आपली चमक दाखवत आहे.





