Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गुणरत्न सदावर्तेंनी वर्तवलं मोठं भाकीत; म्हणाले…
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी संताप व्यक्त केला.

Gunratna Sadavarte : राज्यभरात दसऱ्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्यांच्या तोफा धडाडल्या. बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे, नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मुंबईच्या मैदानात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र, या सर्व मेळाव्यांनंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डागलेली राजकीय तोफ सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी संताप व्यक्त केला. दसऱ्याच्या शुभदिनी मेळाव्यांमध्ये विचारांचे सोने लुटण्याऐवजी निव्वळ राजकीय शिमगा पाहायला मिळाला, असा टोला त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातून राज्याला काही ठोस दिशा किंवा विचार मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही निराशाच पदरी पडली, असे म्हणत त्यांनी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ असा थेट सवाल उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातही वेगळे काही घडले नाही, असे नमूद करत जनतेला सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी बोलावले जाते की एकमेकांना शिव्या-शाप ऐकवण्यासाठी, अशी विचारणा त्यांनी केली. दरम्यान, उदय सामंत यांच्या भूमिकेवर बोलताना आधी जरांगेंना ‘संघर्ष योद्धा’ म्हणणारे आता साधे ‘दादा’सुद्धा म्हणत नाहीत, याकडेही त्यांनी (Gunratna Sadavarte) लक्ष वेधले.
या टीकेदरम्यान सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्यावर आणि कौटुंबिक महत्त्वाकांक्षेवर अत्यंत सनसनाटी विधान केले. उद्धव ठाकरेंसोबतच्या वादामुळे एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्री झाले खरे, पण आगामी काळात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणे मुळीच सोपे नाही, असा दावा त्यांनी केला.
आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी आशा त्यांना वाटत असली, तरी ‘मिलेगा मिलेगा’ असे म्हणून लोक त्यांना निव्वळ हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेत, असा बोचरा टोमणाही त्यांनी लगावला. सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte) या थेट आणि वैयक्तिक हल्ल्यानंतर आता शिंदे गटाकडून यावर काय जोरदार प्रत्युत्तर दिले जाते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






