Gunaratna Sadavartes : “रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी….”; सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली ‘ही’ मोठी मागणी

Gunaratna Sadavartes | Prajakta Mali : संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यात तीव्र स्वरुपाची संतापाची लाट उसळली असून बीड जिल्ह्यात काल दि. २८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुख यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह राजकीय पक्षातील नेते देखील सहभागी झाले होते. या प्रकरणावर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा संदर्भ देत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते.
प्राजक्ताने या प्रकरणी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडत महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले जात आहे, असे म्हटले होते. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तिने सांगितले होते. प्राजक्ता आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या वादावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कला क्षेत्रातील महिलांना अपमानित करणे त्यांची खिल्ली उडवणे हे चुकीचं आहे. यामुळे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी असतील यांनी अल्पवधीत चांगलं काम करून आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र इथे जाणून -बूजन कलाकारांचा अपमान केला जात आहे, असा आरोप यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दरम्यान सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. कालपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. एक लक्षात ठेवा आता कुठेही राजेशाही आणि पाटीलकी चालत नाही. प्रशासन आणि पोलीस या धमक्यांची योग्य ती दखल घेतील, कारवाई होईल असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार !
प्राजक्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीच वेळ मागितली असून आज सायंकाळी ती फडणवीस यांना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्राजक्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले होते.
रुपाली चाकणकरांचे ट्वीट काय?
महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवले पाहिजे, कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत. काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत,
म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना विरोधात ट्विट करून दिला आहे.





