Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव; केली ‘ही’ मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
Gunaratna Sadavarte : या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांत धाव घेतली आहे.

Gunaratna Sadavarte : मुंबईतील प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबईत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, उत्सवाला गालबोट लावणाऱ्या दोन दुर्दैवी घटनांमुळे प्रशासन आणि गणपती मंडळांच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जळगावहून मुंबईत आलेल्या जयदीप मेघराज नेमाडे या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, काळाचौकी परिसरातील महागणपती मंडपाजवळ पाच जणांना विजेचा धक्का बसला. यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांत धाव घेतली आहे. संबंधित गणपती मंडळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच दर्शनासाठी असलेल्या कथित व्हीआयपी संस्कृतीवरही त्यांनी टीका केली.
लालबागच्या राजाच्या मंडळाला आरोपी करा, तसेच काळाचौकी गणपती मंडळालाही आरोपी करा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्यांवरही कारवाई करून त्यांना आरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सदावर्ते म्हणाले, “गणपती बाप्पा मोरया किंवा भक्तांच्या श्रद्धेबाबत कोणताही किंतु-परंतु नाही. मात्र, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. लालबागच्या राजाची स्थापना कोळी बांधवांनी केली होती. मात्र, आता या मंडळांमध्ये ते कोळी बांधव कुठेही दिसत नाहीत.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची परिस्थिती आणि तो दर्शनासाठी लांबून मुंबईत आल्याची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. “गणेशोत्सव मोठा व्हावा, उत्सवाची भव्यता वाढावी; मात्र त्यासाठी कोणाचाही जीव जाता कामा नये,” असेही सदावर्ते यांनी म्हटले. दरम्यान, दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.






