Gulunchwadi Leopard: पिंजऱ्यात एक बिबट्या, बाहेर फिरतायत दोन! मध्यरात्री १ वाजता शाहीर शिंदेंनी पाहिला थरारक दृश्य
Gulunchwadi Leopard: पिंजऱ्याच्या दरवाजातील तांत्रिक दोषामुळे अडकलेला बिबट्या रातोरात पसार; सकाळी पाहणीदरम्यान पिंजरा रिकामा आढळल्याने खळबळ.

Gulunchwadi Leopard- गुळुंचवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच मध्यरात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने या भीतीत आणखी भर पडली आहे. रात्री सुमारे एक वाजता बिबट्या पिंजर्यात अडकला; मात्र सकाळी पाहणी केली असता पिंजरा चक्क रिकामा असल्याचे समोर आले. पिंजर्याच्या दरवाजातील दोषामुळे बिबट्या बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. रात्री एकच्या सुमारास पिंजर्याच्या दरवाजाचा आवाज झाल्याने शाहीर ठकसेन शिंदे यांना जाग आली.
आवाज नेमका कशाचा आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी गाडी घेऊन पिंजरा लावलेल्या ठिकाणी धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या समोर थरारक दृश्य होते. पिंजर्यात एक बिबट्या अडकलेला होता, तर पिंजर्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणखी दोन बिबटे फिरताना दिसले. त्यामुळे एकाच वेळी परिसरात तब्बल तीन बिबट्यांचा वावर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्रीच्या अंधारात तीन बिबटे दिसल्याने कोणताही धोका पत्करू नये म्हणून शिंदे तेथून निघून गेले. सकाळी पुन्हा पिंजर्याची पाहणी करण्यासाठी गेले असता पिंजर्यात बिबट्या नसल्याचे आढळले.
पिंजर्याच्या दरवाजातील दोष दुरुस्त
पिंजर्याच्या दरवाजामध्ये दोष असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने तो दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर पिंजरा पुन्हा व्यवस्थित करून त्याच ठिकाणी लावण्यात आला. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, एक बिबट्या पिंजर्यात अडकलेला असताना आजूबाजूला आणखी दोन बिबटे असल्याचे दृश्य आणि त्यानंतर पिंजरा रिकामा आढळल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. वनविभागाने या परिसरात अधिक काळजीपूर्वक लक्ष ठेवून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




