Gulf War Impact: आखाती युद्धाचा फटका; मॅन्युफॅक्चरिंग PMI घसरून 53.9 वर, उत्पादनात मंदीची चिन्हे
Gulf War Impact:

Gulf War Impact: फेब्रुवारी 28 पासून सुरू झालेल्या आखाती युद्धाचा मार्च महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने काही इंधनाच्या दरात वाढ केलेली आहे. त्याचबरोबर पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाली असल्याचे दिसून येते.
युद्धामुळे देशातून आणि परदेशातून मिळणार्या ऑर्डरवर परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. वाहतुकीचा खर्च वाढत आहे. स्पर्धा वाढली आहे. त्याचबरोबर एकूणच अनिश्चित वातावरण निर्माण झाले आहे. याचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर अर्थातच परिणाम अपेक्षित आहे असे विश्लेषकांनी सांगितले.
एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय मार्च महिन्यामध्ये कमी होऊन 53.9 इतका मोजला गेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा निर्देशांक 56.9 इतका होता. चार वर्षात एखाद्या महिन्यात हा निर्देशांक इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कमी झाला आहे.
सुदैवाने हा निर्देशांक अजूनही 50 अंकाच्या वर आहे. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारात असल्याचे समजले जाते. जून 2022 मध्ये हा निर्देशांक सध्याच्या पातळीवर होता असे हा निर्देशांक तयार करणार्या एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ञ प्रांजूल भंडारी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आखातातील घडामोडीबरोबरच व्यापार युद्ध भडकलेले आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योगांना निर्यातीचा पुरेसा आधार मिळत नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर खनिज तेलाचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत इंधनाचे दरही वाढत राहण्याची शक्यता आहे. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सावध राहून व्यवहार करीत आहे.
इंधनाबरोबरच अॅल्युमिनियम, तांबे, रसायने इत्यादी वस्तूच्या किमती वाढत आहेत. त्याचा वापर उद्योगाकडून दैनंदिन पातळीवर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. असे असले तरी ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, युरोप, जपान ,मध्य पूर्व, तुर्कस्तान, व्हिएतनाममधून ऑर्डरच्या संख्येवर जास्त परिणाम झालेला नाही.





