Fuel Shortage – आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा काहीसा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अफवांनी सोशल मीडिया व्यापून टाकला आहे. जुने, एआय निर्मित फोटो समाजमाध्यमांवर फिरत असून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, लवकरच लाॅकडाऊन लागणार अशा अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. याचा परिणाम गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत शहरातील विविध पेट्रोल पंपांवर दिसून आला. परंतु पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर परिस्िथती सामान्य झाली. शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असून नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हाट्स अॅप , फेसबुक यांसारख्या माध्यमांवर “कडक लॉकडाऊन लवकरच जाहीर होणार” अशा संदेशांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. रामनवमीच्या बॅंकांना सुट्टी असल्यामुळे आणि पेट्रोलियम कंपन्यांनी अॅडव्हान्स पेमेंटची अट घातल्याने काही मोजक्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपले होते. यामुळे अफवांना अधिकच बळ मिळाले. प्रशासनाने या सर्व अफवांचे ठाम खंडन केले आहे. “सध्या लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. अशा अफवांमुळे अनावश्यक गर्दी, वस्तूंचा कृत्रिम तुटवडा आणि सार्वजनिक व्यवस्थेवर ताण निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागून केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.