Construction Sector: आखाती युद्धाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. जर हे युद्ध एप्रिलमध्येही चालले तर भारतातील बांधकाम खर्चावर लघु ते मध्यम पल्ल्यात याचा 5% नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले. त्याचबरोबर कच्चा माल उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत असल्यामुळे बांधकामाचे वेळापत्रक बदलू शकते. अंबुजा नेवोतीया समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन नेवोतिया यांनी सांगितले की, युद्धाआगोदर खनिज तेलाचे दर 70 डॉलर होते. ते आता 110 ते 120 डॉलरवर गेले आहेत. याचा एकूणच विविध क्षेत्रावर परिणाम होत असतो. पोलाद, वाहतूक, पेट्रोकेमिकल मटेरियल इत्यादी क्षेत्रावर याचा परिणाम जाणू लागला आहे. जर एप्रिलमध्ये ह युद्ध लांबले तर याचा परिणाम बांधकाम खर्चावर पुढील एक ते दोन तिमाहीपर्यंत जाणवू शकतो. क्रेडाई पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुशील मोहता यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या मूल्यांकनानुसार जर एप्रिल महिन्यात युद्ध लांबले तर बांधकाम खर्च पाच टक्क्यांनी वाढेल. त्याचबरोबर सध्या आहेत ते प्रकल्प काही प्रमाणात लांबणीवर पडू शकतात. ते म्हणाले की, जर हे युद्ध जास्तच लांबले तर रिअल इस्टेट क्षेत्रावर त्याचा जास्तच परिणाम होईल. रिअल इस्टेट क्षेत्रावर इतर अनेक क्षेत्र अवलंबून असतात. त्यावरही परिणाम होऊन एकूणच अर्थव्यवस्थेला याचे परिणाम सहन करावे लागतील. टीएमटी पोलादाच्या किमती काही शहरांमध्ये अगोदरच 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अगोदर हे दर 62 हजार रुपये होते. आता 72 हजार रुपये प्रति टनावर गेले आहेत. सिमेंटचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र जर मागणी वाढली तर सिमेंटच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिअल इस्टेट क्षेत्रातील काही उद्योजकांनी सांगितले की, आम्ही सध्या तरी घरांच्या किमती वाढविलेल्या नाहीत. मात्र ऊर्जा, पोलाद, सिमेंट इत्यादीचे दर आगामी काळात वाढले तर आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.