Gulf War Impact: आखातातील युद्धाच्या भडक्यामुळे खनिज तेलाच्या किमती 83 डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. इंधनाच्या किमती वाढून भारतात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेवर होणार असल्यामुळे भारताच्या कर्जरोखे बाजारावरही याचा परिणाम होत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या कर्जरोख्यांची विक्री वाढून कर्जरोख्यावरील परतावा सध्या तीन आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. प्राप्त माहितीनुसार 10 वर्षाच्या सरकारी रोख्यावरील परतावा वाढून 6.7112 टक्क्यांवर गेला आहे. 20 फेब्रुवारी नंतर हा परतावा प्रथमच इतक्या उच्च पातळीवर गेला. रोखे बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी कर्जरोखे विक्री वाढली आहे. जर खनिज तेल अधिक महाग झाले तर भारतात यामुळे चलन फुगवठा वाढून भारताच्या चालू खात्यावरील तुटीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे कर्जरोखेधारक विक्री करीत आहेत. हेही वाचा – युद्धाचा भारताला आर्थिक फटका; रुपया गडगडला, महागाई वाढण्याचा धोका मात्र व्यापार्यांनी सांगितले की, युद्धामुळे शेअर बाजार आणि चलन बाजारामध्ये जेवढी अनिश्चितता निर्माण झाली आहे, तेवढी अनिश्चितता कर्जरोखे बाजारात नाही. मात्र तेलाच्या किमती आणखी भडकल्या आणि युद्ध आणखी चिघळले तर या बाजारावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र काही व्यापार्यांनी सांगितले की, सध्या फक्त जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे रोखे बाजारावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था अजूनही भक्कम आहे. अन्यथा रोखे बाजारावर याचा जास्त परिणाम झाला असता. महागाइच्या शक्यतेमुळे रिझर्व बँक पुन्हा व्याजदर वाढीची भूमिका घेऊ शकते असे काही गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र हा प्रकार फक्त भारताच्या बाबतीत घडत नाही तरी तर सर्वच देशाच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. परिस्थिती लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. कारण सर्वच देशावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे युद्ध थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्न वाढण्याची शक्यता आहे.