गुजरात हायकोर्टाने भाजपचे खासदार मुकेश दलाल यांना बजावली नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

अहमदाबाद : गुजरातच्या सूरत लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर बिनविरोध निवडून आलेले भाजपचे खासदार मुकेश दलाल यांच्या विजयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने दलाल यांना नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती जे. सी. दोशी यांच्या न्यायालयाने दलाल यांना 9 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि इतर उमेदवारांनी शर्यतीतून माघार घेतल्याने दलाल यांना 22 एप्रिल रोजी विजयी घोषित करण्यात आले.
गुजरातमधील लोकसभेच्या उर्वरित २५ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झाले. त्यात सुरतसह राज्यात भाजपने 25 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला एक जागा मिळाली. याचिकाकर्त्यांनी सुरतचे जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर यांनी कुंभानी यांचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे सदस्य असलेल्या चार मतदारांनी दाखल केलेल्या दोन याचिकांमध्ये उमेदवारी अर्जांच्या छाननीशी संबंधित लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 36 अन्वये कुंभानी यांचा फॉर्म नाकारण्याच्या रिटर्निंग ऑफिसरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अर्जदारांनी दावा केला आहे की कुंभानी यांच्या तीन प्रस्तावकांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर आधी स्वाक्षरी केली होती. तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सादर केले होते, पण त्यानंतर ते पलटले आणि त्यांनी कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावरील सह्या आपल्या नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. स्वाक्षऱ्यांची पडताळणी करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने दिलेल्या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांसाठी प्रस्तावकांची कमतरता नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक बिनविरोध जिंकणारे दलाल हे गुजरातमधील गेल्या 12 वर्षांतील पहिले उमेदवार ठरले आहेत.





