BJP MLA : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोविंद परमार यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गुजरातच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. आजारपणामुळे त्यांच्यावर आनंद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला. गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. चार वेळा आमदार राहिलेल्या परमार यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. गोविंद परमार यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९९५ मध्ये ते आनंद जिल्ह्यातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पुढे भाजपमध्ये दाखल होत २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.