गुजरात भाजपाच्या अध्यक्षपदी जगदीश विश्वकर्मा यांची निवड

अहमदाबाद : गुजरात भाजपाच्या नवीन अध्यक्षपदी आमदार जगदीश विश्वकर्मा (पांचाळ) यांची निवड निर्विरोध झाली आहे. ते विद्यमान अध्यक्ष सी. आर. पाटिल यांची जागा घेणार आहेत. त्यांच्या नियुक्तीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
गुजरात भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत केवळ विश्वकर्मा यांनीच अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांची निवड निर्विरोध ठरली. या निवडणुकीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. गुजरात भाजपाच्या एकूण 292 सदस्यांनी ही निवडणूक पार पाडली.
जातीय समीकरणांचा विचार –
विश्वकर्मा हे ओबीसी समाजातून येतात. त्यांच्या नियुक्तीमुळे ओबीसी व पाटीदार समाजाचे मत एकत्र आणण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. पुढील वर्षी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
विश्वकर्मांचा राजकीय प्रवास –
जगदीश विश्वकर्मा यांचा जन्म 12 ऑगस्ट 1973 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांनी बिझनेस मार्केटिंगमध्ये पदवी तसेच एमबीए केले आहे. 1998 साली भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. ते निकोल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच अहमदाबाद शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला अहमदाबाद महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळाला होता.
सी. आर. पाटिल यांचा कार्यकाळ –
याआधी पाच वर्षांहून अधिक काळ गुजरात भाजपाच्या अध्यक्षपदी सी. आर. पाटिल होते. त्यांच्या अध्यक्षतेत 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 182 पैकी 156 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने गुजरातमधील 26 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. पाटिल यांना 2024 मध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात जलशक्ती मंत्री म्हणून स्थान मिळाले. त्यानंतरच गुजरात भाजपाच्या अध्यक्षपदी नवे चेहरे आणण्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर पक्षाने ही जबाबदारी जगदीश विश्वकर्मा यांच्यावर सोपवली आहे.

