गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पालकमंत्री अजित पवारांचे ट्वीट; जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश, नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन

Ajit Pawar | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसुती दरम्यान तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर पुणे शहरात संतापाची लाट उसळून आली आहे.
या प्रकरणानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एक्सवरुन प्रतिक्रिया दिली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णानालयाने दखल न घेतल्याने एका गर्भवर्ती महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेची शासाने दखल घेतली आहे. याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापन करण्यात असून, सर्व घटकांचा विचार करुन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी पोस्ट अजित पवार यांनी केली आहे.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 4, 2025
नागरिकांनी संयम बाळगावा
या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.





