GST 2.0 : जीएसटी दरकपातीचा दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पुणे – जीएसटी दरातील बदलामुळे दूधजन्य पदार्थांच्या किमतीत घट होणार असून याचा फायदा फक्त ग्राहकांनाच नव्हे तर शेतकऱ्यांनाही होणार आहे. कर कपात व सूट मिळाल्याने या उत्पादनांचा वापर वाढण्यास चालना मिळेल, असे मत दुग्धव्यवसायिकांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने दरकपातीची घोषणा करताना सांगितले की, यूएचटी (UHT) दूध वगळता सर्व प्रकारचे दूध आधीच जीएसटीमुक्त आहे. त्यामुळे समान दर्जाच्या वस्तूंना समान कर उपचार देण्यासाठी यूएचटी दूधालाही सूट देण्यात आली आहे. वनस्पती-आधारित दूधपेयांवर आधी १८ टक्के जीएसटी होता, तर सोया दूधपेयांवर १२ टक्के जीएसटी होता. आता हे दोन्ही दर कमी करून केवळ ५ टक्के करण्यात आले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले की, आवश्यक वस्तूंवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागू होऊ नये, मग त्या वस्तू कोणत्याही प्रकारे विकल्या गेल्या तरी चालेल. “जीएसटी केवळ महसूल वाढीसाठीच नव्हे, तर अप्रत्यक्षपणे दर्जा नियंत्रण व भेसळ रोखण्यासाठीही उपयोगात आणला जाऊ शकतो,” असे ते म्हणाले.
“दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्या दैनंदिन आहाराचा महत्वाचा भाग आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच यूएचटी दूध, दूधावर आधारित पेये, पनीर, लोणी, तूप, चीज यांसारख्या उत्पादनांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. ही खूपच स्वागतार्ह बाब आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांचा मासिक खर्च कमी होईल आणि अधिक लोकांना उत्तम दर्जाची, सुरक्षित आणि पॅकेज्ड दूध-उत्पादने घेणे परवडेल.
गेल्या काही वर्षांत अशा उत्पादनांचा वापर वाढताना दिसतो आहे आणि आता करकपात झाल्यामुळे त्यांची मागणी आणखी वाढेल. याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, कारण आपल्या देशात दूध उत्पादन शेतीसोबत जोडून केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्राहकांनाही सर्वोत्तम ब्रँडेड उत्पादने मिळतील. याशिवाय, या उद्योगात वापरल्या जाणाऱ्या साधनांवरील जीएसटीही कमी केल्याने संपूर्ण पुरवठा व्यवस्था (सप्लाय चेन) अधिक मजबूत होईल. आपल्याकडे पनीरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
आता पॅक्ड पनीरवरील जीएसटी शून्य केल्यामुळे ते ग्राहक आणि व्यावसायिकांना आणखी सोयीस्कर दरात मिळेल. तसेच चीज, तूप, लोणी, जॅम, सॉस आणि आईस्क्रीम यांच्यावरील जीएसटी कमी झाल्याने लोकांचा ब्रँडेड उत्पादनांकडे कल वाढेल. या सगळ्या निर्णयांमुळे देशातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठ अधिक संघटित आणि प्रगत होण्यास मदत होईल”, असे चितळे डेअरी चे मॅनेजिंग पार्टनर निखील चितळे यांनी नमूद केले.





