जीएसटी दरकपातीनंतर वाहन विक्रीत उसळी; नवरात्रीत ३५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारने 15 ऑगस्ट रोजी जीएसटी दरात कपात होणार असल्याची घोषणा केल्यामुळे 22 सप्टेंबरपर्यंत वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. जीएसटी कपातीची अंमलबजावणी 22 सप्टेंबरला सुरू झाल्यानंतर वाहन विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवरात्रीच्या काळात वाहन विक्री 35 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात किरकोळ वाहन विक्रीत म्हणजे वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या वाहन विक्रीत सहा टक्क्याची वाढ होण्यास मदत झाली.
यावर्षी नवरात्रीच्या काळामध्ये 2.17 लाख वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ही संख्या 1.61 लाख युनिट होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण वाहन विक्री 2.99 लाख युनिट होण्यास मदत झाली. गेल्या वर्षी ही संख्या 2.82 लाख युनिट होती.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेचे उपाध्यक्ष साई गिरीधर यांनी सांगितले की, सप्टेंबर महिना वितरणासाठी नाट्यमय ठरला आहे. अगोदर आम्ही चिंतेत होतो. मात्र 22 सप्टेंबरनंतर नऊ दिवस ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. सप्टेंबर महिन्यात तीन चाकी आणि बांधकाम साहित्य वगळता इतर सर्व क्षेत्रातील वाहनांची विक्री झाली.
आता दसरा समाप्त झाला असला तरी पुढील 32 दिवस उत्सवाचा कालावधी समजला जातो. त्यामध्ये दिवाळीचा समावेश असतो.या कालावधीतही वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यमवर्गीय लोक मोटरसायकल ऐवजी छोट्या कार खरेदी करण्याची शक्यता वाढली आहे.
दुचाकीच्या विक्रीत 7 टक्के वाढ –
सप्टेंबर मध्ये दुचाकी विक्री सात टक्क्यांनी वाढून 12.87 लाख युनिट झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 12.08 लाख युनिट होती. नवरात्रीच्या काळात ही विक्री 36 टक्क्यांनी वाढून 8.35 लाख युनिट झाली. गेल्या वर्षी ही संख्या 6.14 लाख युनिट होती. असाच प्रकार इतर वाहनाच्या बाबतीत घडला असल्याचे वितरकांच्या संघटनेने नमूद केले आहे. सप्टेंबरमध्ये व्यावसायिक वाहन विक्रीत तीन टक्क्यांनी, ट्रॅक्टर विक्री चार टक्क्यांनी वाढली.




