Stock Market : बुधवारी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 386.47 अंकांनी म्हणजेच 0.47% घसरून 81,715.63 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 112.60 अंकांनी म्हणजेच 0.45% खाली येऊन 25,056.90 वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात आयटी आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी घसरणीत महत्त्वाची भूमिका बजावली. अमेरिकेतील H-1B व्हिसाच्या नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय, सरकारच्या GST 2.0 अंतर्गत करदरांमध्ये बदल झाल्याने आलेल्या तेजीनंतर नफावसुली झाल्याचे दिसून आले. घसरणीची प्रमुख कारणे – जियोजीत इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले, “GST सुधारणांनंतर भारतीय बाजारात नफावसुली दिसून आली, कारण गुंतवणूकदार मूल्यांकन आणि दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अपेक्षांचा नव्याने आढावा घेत आहेत. H-1B व्हिसा शुल्कवाढीमुळे आयटी समभागांची कामगिरी कमकुवत राहिली. भारत-अमेरिका व्यापारी करारावरील चर्चेदरम्यान अमेरिकेच्या व्यापारी वक्तव्यांमुळे आणि जागतिक स्तरावरील कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. भारतातील तुलनेने उच्च मूल्यांकन आणि कमाई वाढीतील मंदीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) आपली गुंतवणूक कमी करत आहेत.” आजचे टॉप लूझर्स – आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या समभागात सर्वाधिक 2.63% घसरण दिसून आली. इंडसइंड बँक 1.9% खाली बंद झाली, तर अल्ट्राटेक सिमेंट 1.5% आणि टेक महिंद्रा 1.33% घसरले. महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग 1.10% खाली बंद झाले. आजचे टॉप गेनर्स – दुसरीकडे, पॉवर ग्रिडचे समभाग 1.63% वाढीसह बंद झाले, तर NTPC 1.35% मजबूत झाले. HUL चे समभाग 1.09% आणि मारुती सुझुकी 0.95% वाढीसह बंद झाले. HCL टेकच्या समभागात 0.88% ची वाढ नोंदवली गेली.