Electric vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा वाढता कल; इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ‘ई-वाहनां’ना पसंती
Electric vehicles : शहरात ५ महिन्यांत साडेसात हजार वाहनांची नोंदणी

पिंपरी – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती आणि वाढते प्रदूषण यावर पर्याय म्हणून पिंपरी-चिंचवडकरांचा इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) खरेदीकडे कल वाढला आहे.
यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांतच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात (आऱटीओ) साडेसात हजार इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. विशेषतः गेल्या दोन महिन्यांत या वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शासनाने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी ई-वाहन धोरण जाहीर केले असून, त्याअंतर्गत खरेदीदारांना विविध सवलती दिल्या जातात. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ई-वाहन वापरणे कमी खर्चिक असल्याने आणि प्रदूषण रोखण्यास हातभार लागत असल्याने नागरिक या पर्यायाकडे वळत आहेत.
पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये १ जून २०२६ पर्यंत एकूण ८० हजार ७०२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली असून, यामध्ये बॅटरी ऑपरेटेड आणि प्युअर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. या वाढत्या खर्चातून कायमची सुटका करून घेण्यासाठी नागरिक ‘ईव्ही’चा पर्याय स्वीकारत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ३ हजार ८८९ वाहनांची विक्री झाली होती, तर यंदा याच काळात तब्बल ५ हजार १५५ वाहनांची विक्री झाली आहे.
५ हजार ९४ ग्राहकांनी घेतली स्वतंत्र वीजजोडणी
इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांना स्वतंत्र वीजजोडणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ग्राहकांना त्यांच्या घरगुती, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वीजजोडणीतूनच वाहन चार्ज करावे लागत होते.
त्यामुळे मासिक वीजवापर वाढून ‘स्लॅब’ बदलत होता आणि ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. याची दखल घेऊन महावितरणने ‘ईव्ही’ चार्जिंगसाठी स्वतंत्र जोडणी देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत ५ हजार ९४ नागरिकांनी ही स्वतंत्र वीजजोडणी घेतली आहे. यासाठी महावितरणने प्रति युनिट स्वतंत्र वीजदरही निश्चित केला आहे.
जानेवारी १२१२
फेब्रुवारी १०३७
मार्च २०१७
एप्रिल १४७५
मे १६६२ |





