जगाच्या कोपऱ्यातील शेवटचं थंडगार ग्रिम्से बेट; लोकसंख्या फक्त २० पण पक्षांची संख्या १० लाख…

Grimsey Island | ग्रिम्से हे फक्त 20 लोकसंख्या आणि 10 लाख पक्ष्यांचं वास्तव्य असलेलं जगाच्या कोपऱ्यातलं शेवटचं बेट आईसलँडच्या उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे.
येथून 40 किमी प्रवास केला की जगात कुठेच दिसत नाहीत असे सुंदर पक्षी, जोरदार वारे आणि युरोपातली सगळ्यात दुर्गम वस्ती असलेलं हे ग्रिम्से बेटादृष्टीस पडते. 6.5 चौरस किलोमीटर आकाराचं, आईसलँडच्या उत्तरेकडे असणारं हे छोटंसं ग्रिम्से बेट मानवी वस्ती असणारं उत्तर ध्रुवावरची सगळ्यात शेवटची आणि एकमेव जागा आहे.
एका थंडगार, दुर्गम देशाचा हा आणखी थंडगार दुर्गम भाग आहे. येथे पोहोचणंही तितकंच कठिण आहे. एक छोटीशी नाव हा 1931 पर्यंत ग्रिम्सेपर्यंत पोहोचायचा एकमेव मार्ग होता. वर्षातून दोनच वेळा या बोटीतून इथून पत्रव्यवहार करता यायचा. पण आता आकुरेरी या आईसलँडमधल्या शहरातून 20 मिनिटं विमान प्रवास आणि पुढे डाल्विक गावातून तीन तासाचा नावेने प्रवास केला की साहसी प्रवाशांना या खडकाळ, दुर्गम बेटावर येता येतं.
इथं येणारे बरेच जण सगळ्यात दुर्लक्षित राहिलेली वस्ती आणि रंगीबेरंगी पक्षी बघायची उत्सुक असतात. आईसलँडमध्ये वीजेसाठी भूऔष्णिक आणि अक्षय उर्जेचा वापर केला असला, तरी ग्रिम्से बेट इतकं लांब आहे की ते राष्ट्रीय उर्जेचं जाळं तिथंपर्यंत पोहोचवता येत नाही. त्यामुळे हे बेट एका डिझेल जनरेटरवर चालतं.येथे भेट द्यायचा सुयोग्य काळ म्हणजे एप्रिल 10 ते ऑगस्ट 10 आहे.
पफिन्स पक्षी ग्रिम्सेत आलेले असतात. आर्क्टिक ट्रीप या संस्थेकडून पक्षी निरिक्षणाचे सत्रही घेतलं जातं.प्रवाशांना चालवत वेगवेगळे पक्षी दाखवले जातात, तर इतर टूर कंपन्या बोटीतून पक्षी दाखवायला नेतात.ग्रिम्सेवर हॉस्पिटल, डॉक्टर किंवा पोलिस स्टेशन नाही. काही आपतकालिन परिस्थिती ओढावलीच तर स्थानिकांना प्रशिक्षण दिलेलं आहे.
बेटाच्या दक्षिण पश्चिम भागात स्थानिकांच्या घरांची रांग आहे. तिथंच प्रवाशांसाठीही घरं आहेत. या वस्तीला सँडविक म्हणतात. त्यात एक शाळाही आहे. पण आता ती जागा समुह केंद्र म्हणून वापरली जाते.याशिवाय, एक हस्तकला प्रदर्शनाची खोली आणि घरी बनवलेले बर्फात गरजेचे असणारे कपडे, विणलेल्या गोष्टी आणि घर सजावटीचं सामान विकणारं एक कॅफेही आहे. बेटावर छोटंसं वाण सामानाचं दुकान आहे. दिवसातून एकच तास ते सुरू असतं.
ग्रिम्से सध्या तरी उत्तर ध्रुव वृत्तांत येत असल्याने येथील स्थानिकांना ध्रुवीय रात्र अनुभवता येते. याचा अर्थ, डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत बेट सुर्यप्रकाशाविना संपूर्ण अंधारात असतं.




