Pimpri :शिवारात भरतेय पाखरांची शाळा

नाणे मावळ, दि. ११ – इंद्रायणी काठ परिसर व नाणे मावळ परिसर शिवार रब्बी पिकाने बहरली आहेत. ज्वारी पोटऱ्यात असल्याने शिवारात पक्षी पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे शेतात पाखरांची शाळा भरू लागली आहे. पिकांकडे पक्षी आकर्षित होत आहेत.
दरम्यान, काही भागात अथवा डोंगर पायथ्याशी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे शेतकरी विविध वन्य प्राण्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत आहेत. बळीराजांनी अनेक युक्त्या लढवून, धावपळ करून रब्बी पीक जतन केले. रब्बी ज्वारीसाठी पोषक वातावरण आहे. पीक भरले असून सध्या ज्वारी पीक पोटऱ्यात आहे, तर गव्हाला ओंब्या लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून, लवकरच हुरडा येणार आहे.
गतवर्षी पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्यामुळे नाणे मावळातील शेतकऱ्याने गहू, हरभरा, ज्वारीचा पेरा वाढवला. सध्या पोषक वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली बहरली आहेत. पोटऱ्यातील ज्वारीचे पीक काही ठिकाणी तयार होऊन कणसे दिसत आहेत. लवकर पेरणी झालेल्या ठिकाणी मात्र, ज्वारी कणसाच्या स्थितीत आहे. ज्वारीमुळे पशुधनाच्या कडब्याचा प्रश्न सुटणार आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची घाटी भरलेली आहेत. हरभरा पीक हाता-तोंडाला आले आहे. तर काही ठिकाणी मसूर ही फुलावऱ्यात आली आहे. तर वाटाणा काढणीला आला आहे.
पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पिकांची जोमदार वाढ होऊन ज्वारी पोटरीत येते. ७० ते ७५ दिवसात ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणसाचे वजन वाढून उत्पादन वाढते. या कालावधीत संरक्षित पाणी दिल्यास ज्वारीच्या उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होते.
– पि. डी. साबळे, कृषी सहायक, मंडल गवित्री.





