Nagar : निसर्गाचे संतुलनासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची
शेवगाव : निसर्गाचे संतुलन टिकविण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची असते. पक्षी हे सृष्टीतील सुंदर रत्न आहे. पक्षी हे स्वतःपुरता विचार न करता सर्वांचा विचार करतात, हे पक्ष्यांकडून मानवाने शिकण्याची गरज आहे. अलिकडे मानवामुळे पक्षांच्या अधिवासाचा ऱ्हास होत असल्याची खंत पुणे येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी व्यक्त केली.३७ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाचे उद्घाटक म्हणून सप्तश्री बोलत होते. संमेलनाची सुरुवात वृक्ष दिंडी आणि ग्रंथदिंडीने झाली. संमेलनस्थळी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले .
संमेलनाचे प्रमुख पाहुणे जागतिक छायाचित्रकार बैजू पाटील यांनी नवनवीन गोष्टी शिकून आपला छंद जोपासला पाहिजे. असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील म्हणाले ,पक्षी हे अनादी काळापासून सृष्टीत आहेत. प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. ही एक जीव साखळी आहे. आज जंगल उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. त्यामुळे पशु-पक्षी हे शहराच्या ठिकाणी आढळून येतात.यावरून मानवांचे लक्ष पक्षी संवर्धनाकडे नसल्याचे जाणवते. पक्षी संवर्धनासाठी अनेक कायदे आहेत परंतु अजून चांगले प्रगल्भ कायदे होण्याची गरज आहे. महाराष्ट्र पक्षी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल माळी यांनी पक्षी संवर्धन, अधिवासचा ऱ्हास, पक्ष्यांविषयी जनजागृती, लोकाभय परिसर घोषित करावा, शिकार बंदीकरिता नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी ‘पक्षीही सुस्वरे आळविती’ या स्मरणिकेचे तसेच डॉ.अनिल माळी लिखित ‘पक्षी विषयक जनजागृती’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पक्षिमित्र २०२४ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील गोविंद रघुनाथ सबनीस, पक्षी संवर्धन पुरस्कार बेळगाव येथील फिरोज गुलाब चाऊस, पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील माणिक प्रल्हाद पुरी, पक्षी जनजागृती पुरस्कार वर्धा येथील राहुल वकारे, उदयमुख पक्षी निरीक्षक पुरस्कार शेवगाव येथील सुशांत मनवरे तर पक्षी फेलोशिप, स्कॉलरशिपचा दहा हजाराचा चेक आणि सन्मानचिन्ह कपिल दैवत यांना देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
दिवसभरात परभणी येथील माणिक पुरी, अहिल्यानगर येथील डॉ. सुधाकर कुऱ्हाडे ,वर्धा येथील राहुल वकारे ,अकोला येथील डॉ. मिलिंद शिरभाते अमरावती येथील डॉ. अश्विन लुंगे, नाशिक येथील रवींद्र वामनाचार्य, शेवगावच्या डॉ.उषा शेरखाने यांची विविध विषयावर मार्गदर्शन झाले. विविध जिल्ह्यातील १२७ पक्षीमित्र उपस्थित होते. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . संमेलनाचे स्वागताध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी स्वागत केले. प्रा. सोपान नवथर यांनी सूत्रसंचलन केले तर प्रा.सचिन पवार यांनी आभार मानले.





