Diwali 2025 : ‘दिल्लीत ग्रीन फटक्यांना परवानगी’; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Diwali 2025 – दिल्ली-एनसीआर परिसरात येत्या १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान नियमांमध्ये शिथिलता देत पर्यावरणपूरक हरित अर्थात ग्रीन फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. फटाके फोडण्यासाठी सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते १० या दरम्यानच वेळ देण्यात आली आहे.
ही सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर आज पार पडली. यासंदर्भात केंद्र सरकार आणि दिल्ली-एनसीआरमधील राज्य सरकारांनी ग्रीन फटक्यांना परवाणगी देण्याची विनंती केली होती.
खंडपीठाने नमुद केले की, १८ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत ग्रीन फटाक्यांची विक्री आणि फेडण्यास परवानगी देत आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत ग्रीन फटाके फोडता येईल.
मात्र, ई-कॉमर्स वेबसाइटवरून फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देता येणार नाही. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) संकेतस्थळावर अपलोड केलेल्या ग्रीन फटाक्यांचीच विक्री करण्यास परवानगी असल्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
दरम्यान, या कालावधीत हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याचे आणि १४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान फटाक्यांमुळे दिल्लीच्या हवेवर होणाऱ्या परिणामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शासनाने निवडलेल्या फटाके विक्री केंद्रातूनच हरित फटाक्यांची विक्री करावी आणि त्यांची नियमित तपासणी संबंधित गस्त पथकाने करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
एनसीआर बाहेरच्या कोणत्याही फटाक्यांना या परिसरात विक्रीला बंदी असेल आणि बनावट फटाके विकणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या विक्रेता अथवा कंपनीचे परवाने तत्काळ निलंबित करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.





