अनुदानामुळे ‘फॅन’ची निर्मिती वाढणार

नवी दिल्ली – आगामी काळात भारतातील फॅन निर्मिती उद्योग विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कमी उर्जेवर चालणाऱ्या फॅनला चालना देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत उत्पादन आधारित अनुदान देण्याच्या योजनेमध्ये फॅन निर्मिती उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे.
मात्र भारतामध्ये फॅनवर सध्या तब्बल 18 टक्के इतका जीएसटी लावला जातो. तो कमी करून पाच टक्के करण्याची आवश्यकता या क्षेत्राने केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहे. एक जुलैपासून फॅनवर बीईई स्टार लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे. संदर्भात भारतीय फॅन उत्पादक संघटनेने म्हटले आहे की, कमी ऊर्जा वापरणाऱ्या फॅनमुळे विजेचा वापर कमी होणार असला तरी त्यांच्या किमती मध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
या संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सिंग यांनी सांगितले की, आगामी काळामध्ये कमी ऊर्जेचा वापर करणारे फॅन निर्माण करण्यासाठी या उद्योगाला तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. या परिस्थितीमध्ये जर केंद्र सरकारने त्यांवरील जीएसटी रेट कमी केला तर त्यामुळे त्यांची विक्री वाढून या उद्योगाची उलाढाल वाढेल. यातून या उद्योगाला या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास मदत होईल.
कमी ऊर्जेचा वापर तयार करणाऱ्या फॅनची भारतातील संख्या वाढल्यानंतर त्यामुळे केवळ भारतातील विजेचा वापर कमी होणार नाही तर अशा प्रकारच्या फॅनची निर्यात होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकणार आहे.
सध्या भारतातील हा उद्योग साधारणपणे 6 कोटी फॅनची निर्मिती करतो. फॅन उद्योगाची उलाढाल 8 हजार कोटी रुपयांची आहे. गेल्या दोन उन्हाळ्यामध्ये करोना व्हायरसमुळे या उद्योगाच्या विक्रीवर 18 ते 20 टक्क्याचा परिणाम झाला आहे. या संघटने मध्ये साधारणपणे 500 निर्माते असून देशात दीड लाख रिटेलरच्या माध्यमातून फॅनची विक्री केली जाते.





