Panasonic Fridge : पॅनासोनीक फ्रिजचे उत्पादन थांबविणार; स्पर्धा वाढल्यामुळे घेतला निर्णय

नवी दिल्ली : बदललेल्या जागतिक परिस्थितीत काही बहु राष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनांत फेरफार करत आहेत. जपानमधील पॅनासोनीक कंपनी भारतामध्ये बर्याच दशकापासून कार्यरत आहे. आता या कंपनीने भारतातील वाशिंग मशीन आणि फ्रिजचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे ही दोन उत्पादने निर्माण करणे कंपनीला परवडत नसल्याचे यातून दिसून येत आहे. मात्र पॅनासॉनिक कंपनी भारतामध्ये टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि इतर उद्योगांना सुट्या भागाचा पुरवठा या व्यवहारावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
पॅनासोनीक कंपनीचे जझ्झर येथे उत्पादन प्रकल्प आहेत. या ठिकाणी वॉशिंग मशीन आणि फ्रीजचे उत्पादन घेतले जाते. या प्रकल्पातील कामकाजावर जास्त परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या सूत्रांचा अहवाला देऊन काही वृत्त माध्यमांनी सांगितले की, या क्षेत्रामध्ये ही कंपनी काही वर्षांपूर्वी आघाडीवर होती. मात्र आता चीन आणि दक्षिण कोरियातील काही कंपन्यांनी या क्षेत्रात आगेकूच केली आहे. त्यामुळे पॅनासोनीकची या क्षेत्रातील बाजाराचा हिस्सा वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थित ही उत्पादने बंद करून इतर उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने ठरविले असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार या प्रकल्पातील उत्पादन थांबविले जाणार असले तरी या प्रकल्पातून इतर कंपन्यासाठी पॅनासोनीक कंपनी उत्पादन घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचार्यावर जास्त परिणाम होणार नाही असे समजले जात आहे. काही अतिरिक्त कर्मचारी तर प्रकल्पात हलविले जाऊ शकतात. यासाठी आहे त्या कारखान्यातील कर्मचार्यांना नवीन उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्या शक्यतेवर कंपनी विचार करीत असल्याचे समजले जाते.
बाजारपेठेतील वाटा कमी
बाजारपेठेतील माहितीनुसार पॅनासोनीकचा वाशिंग मशीन बाजारपेठेतील वाटा कमी होऊन केवळ 1.8 टक्के इतका झाला आहे. तर फ्रीजच्या बाजारपेठेतील या कंपनीचा वाटा कमी होऊन 0.8 टक्के इतका झाला आहे. अशा परिस्थितीत ही दोन्ही उत्पादने चालू ठेवणे कंपनीच्या व्यवस्थापनाला परवडत नाही. यामुळे ही उत्पादने बंद करून या प्रकल्पात इतर उत्पादने घेण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगितले जाते.





