पुणे | शालेय साहित्य , गणवेशासाठीचे अनुदान थेट खात्यात होणार जमा

पुणे, { प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना २०२४- २५ या शैक्षणिक वर्षासाठीचे शालेय साहित्य आणि गणवेशासाठीचे अनुदान आज (शुक्रवार) पासून मुलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
शिक्षण विभागाकडून समाविष्ट ३४ गावांसह, महापालिकेच्या जुन्या हद्दीतील ८२ हजार ६५४ मुलांच्या अनुदानाचे बील महापालिकेस सादर केले. मुख्यलेखापाल विभागानेही त्यानुसार निधी वितरीत करण्यास गुरूवारी मान्यता दिली आहे.
शाळा सुरू झाल्यानंतरही पालिकेच्या शिक्षण विभागाकडून डीबीटी बाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली नव्हती. दैनिक प्रभातने लाखभर विद्यार्थी वाऱ्यावर.
या वृत्ताद्वारे उघड्कीस आणली होती. त्यानंतर, महापालिका प्रशासनाकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर मागील महिनाभरात ही बिले तयार झाली असून अखेर उद्यापासून मुलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
या वर्षासाठी ८२ हजार ६५४ मुलांच्या खात्यात पैसे देण्यात येणार आहेत. ३४ गावांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून त्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
त्यानुसार या सर्व विद्यार्थ्यांना पैसे देण्यासाठी २६ कोटी ६४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मागील वर्षी मुलांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या रकमेचे शुल्क निश्चित होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागला होता.
त्यामुळे महापालिका आयुक्तांनी एप्रिल महिन्याच्या वित्तीय समितीमध्येच मागील वर्षांच्या शैक्षणिक साहित्याच्या दरात १० टक्के वाढ करून निधी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास दोन महिन्यांचा कालावधी गेल्याने मुलांना अद्यापही साहित्य घेता आलेले नाही.





