Gramin News : विद्यार्थीच बनले व्यापारी ! ‘श्री गुरुदेव दत्त’ विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

शिरूर : सविंदणे ता. शिरूर येथील श्री गुरुदेव दत्त विदयालयातील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विदयार्थ्यांनी ओपन डे आणि आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आपल्या शेतातून आणलेल्या विविध प्रकारच्या भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी, गवती चहा, वांगी, पालक, मेथी, गावरान भाज्या, फळे, आवळे मसाले, लोणची बरण्या तसेच खाऊगल्ली मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ भेळ, पाणीपुरी, तिखट पुऱ्या भजी, सामोसे, लाडू वडापाव अशा चटकदार पदार्थांनी पालकवर्ग व ग्राहकांना आकर्षित केले.
या निमित्ताने गावातील प्रतिष्ठित नागरिक , ग्रामस्थ आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व पालकांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला खाऊ गल्लीचा आस्वाद घेतला. आनंद मेळाव्याचे आयोजन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या मेळाव्याला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
तुम्ही आम्ही मोठमोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरताना पाहिले आहेत पण एखाद्या शाळेत मुलांनी भरवलेला भाज्यांचा व दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करणारा बाजार पाहिला नसेल. असा आगळावेगळा प्रयोग सविंदणे परिसरातील श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे या शाळेत केला आहे.
विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे तसेच केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे हाच त्यामागचा उद्देश आहे. सविंदणे गावचे सरपंच मनीषाताई नरवडे माजी सरपंच शुभांगी पडवळ, राजू धोत्रे, बाळासाहेब भोर व सर्व ग्रामस्थ यांनी विद्यालयातील नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले.





