ओतूर : ओतूर ता. जुन्नर येथून जवळच असलेल्या डोमेवाडी येथे सोमवारी दुपारी आकाशातून वेगाने बर्फाचा मोठा गोळा पडला असून स्थानिक नागरीकांच्या माहिती नुसार हा बर्फाचा गोळा अंदाजे ३० ते ४० किलोचा असावा. ओतूर येथील डोमेवाडी येथे बाबाजी वाजगे यांच्या सोयाबीन च्या शेतात दुपारी साडेबारा वाजे दरम्यान बर्फाचा मोठा गोळा पडला. याच परीसरातील काही शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तो पाहिला तसेच काही मुलांनी तेथील बर्फ खेळण्यासाठी नेला. त्यानंतर येथे बघ्यांची गर्दी जमली. याबाबत माहिती मिळाल्या नंतर ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके, तलाठी अतुल विभूते, कर्मचारी संदिप राऊत यांनी सदर ठिकाणी दुपारी अडीच वाजे दरम्यान जाऊन पहाणी केली. यावेळी तो बर्फाचा गोळा वितळला होता. मात्र त्याठिकाणी पाणी व छोटा खड्डा पडलेला दिसून आला आहे.