Satara | ग्रामपंचायत इमारत विकासाचे केंद्र व्हावी

दहिवडी, (प्रतिनिधी)- शिरवलीत यापूर्वीच चांगली ग्रामपंचायत इमारत व्हायला हवी होती. आता ती होत आहे याचा आनंद आहे. ही ग्रामपंचायत इमारत विकासाचे केंद्र व्हावी.
पुढील काळात तुम्हाला सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत इमारत हक्काचे ठिकाण होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
शिरवली (ता. माण) येथे ग्रामपंचायत इमारत व बहुउद्देशीय सेवा केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून आमदार अरुण लाड यांच्या स्थानिक विकास निधीतून सात लाख रुपये, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या सहकार्यातून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत ऑफिस बांधणी योजनेतून वीस लाख रुपये या निधीमधून हे काम करण्यात येत आहे.
यावेळी बाळासाहेब सावंत, बाळासाहेब कदम, संतोष पवार, उदय जगदाळे, महादेव इंगळे, बशीर मुलाणी, रफिक मुलाणी, बाळासाहेब चव्हाण, दादा दडस, रमेश शिंदे, अशोक पोतेकर, बाळासाहेब चव्हाण, वैभव खरात, शैलेश देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, सध्याची उभी राहणारी इमारत पूर्णपणे अत्याधुनिक असून ग्रामसेवक, तलाठी तसेच महिला बचतगटांसाठी सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे.
तसेच शिरवलीकरांना अभिमान वाटावा अशी व्यायायशाळा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहेत. अनिल देसाई म्हणाले, या गावाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत.
माणसं पेटवायचं, घर पेटवायचं नाही तर चूली पेटवण्याचं काम आम्ही करतो. पंधरा वर्ष सत्तेत बसून पण लोकप्रतिनिधींना जनतेशी बोलायला वेळ नाही. अशा लोकांना नियती धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. उपसरपंच तुकाराम जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. गणेश जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.
जमीन दान करणाऱ्यांचा सत्कार
या इमारतीसाठी विनामोबदला जागा देणारे रामचंद्र माधव जगदाळे, शिवाजी सर्जेराव जगदाळे, गोरखनाथ नामदेव जगदाळे व भरत नामदेव जगदाळे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.




