माण-खटाव विधानसभा मतदारसंघ: ‘मी आणि माझे कार्यकर्ते प्रभाकर घार्गेसोबत’ : प्रभाकर देशमुख

दहिवडी – प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी देण्याचा शरद पवार यांनी जो निर्णय घेतलाय तो आमच्यासाठी अंतिम आदेश आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाकर देशमुख असतील वा प्रभाकर घार्गे निवडणूक ही एकाच ताकदीने लढविण्यात येईल. माण-खटाव मतदारसंघात तयार झालेली परिवर्तनाची लाट अधिक गतीमान करण्यात येईल. या मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके, रमेश शिंदे, लालासाहेब ढवाण आदी मान्यवर उपस्थित होते. मी उमेदवारी करणार ही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ती पुर्ण न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. बैठक घेऊन प्रमुख कार्यकर्ते तसेच अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यापुढे प्रभाकर घार्गे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः व पक्षाचे सर्व कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत.
शरद पवार यांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या हिताची राहिली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे पक्षात फुट होवून सुध्दा सामान्य जनता, मतदार शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत.
इथले लोकप्रतिनिधी पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आलाय म्हणतात. प्रश्न समजून घेवून दृष्टीक्षेपात यायला पंधरा वर्ष लागतात का? हे काही कार्यक्षमतेचे लक्षण नाही.
हिंगणीला पाणी गेल्याशिवाय अर्ज भरणार नाही म्हणाले होते, गेलं का हिंगणीला पाणी? बिजवडीला पाणी एक वर्षात गेलं नाही तर राजीनामा देईन असं मागील वेळी म्हणाले होते, गेलं का बिजवडीला पाणी? त्याच त्याच पाईपचं पुजन दरवेळी केलं जात आहे. थापा मारुन लोकांना फसवायचं हे फार काळ टिकणार नाही. उरमोडीचं असो वा टेंभूचं पाणी याचं श्रेय हे शरद पवार यांचं आहे. फुकटचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, तो दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींनी मायणी मेडिकलसह विविध प्रकरणात गाजवलेल्या कर्तृत्वामुळे आपला मतदारसंघ सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे.
माण-खटाव मतदारसंघात परिवर्तन होणार का? तर निश्चित होणार आहे. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करु. आम्हाला विजय मिळेल याची आम्हाला खात्री आहे.





