तुहीनकांत पांडे सेबीचे नवे अध्यक्ष; तीन वर्षांसाठी नियुक्ती

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्त सचिव तुहीन कांत पांडे यांची नेमणूक केली आहे. मंत्रीमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने याला मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. विद्यमान अध्यक्ष माधवी पुरी बूच यांचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. त्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. तसंच खासगी क्षेत्रातून नियुक्त केलेल्या पहिल्या व्यक्ती होत्या.
पांडे यांनी अर्थ मंत्रालयात प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन शेअर बाजारावर नोंदली गेली. त्याचबरोबर एअर इंडियाचे खासगीकरण झाले. या महत्त्वाच्या पदावर या अगोदर बहुतांश वेळा सरकारी नोकराची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र बूच खासगी क्षेत्रातून या पदावर आल्या होत्या. तसेच त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयावर बराच वाद झाला होता.
59 वर्षीय पांडे वित्त सचिव म्हणून काम करत होते. नियमाला धरून काम करण्याबाबत त्यांचे ख्याती आहे. दोन महिन्यांमध्ये अर्थ मंत्रालयातील दोन अधिकार्यांच्या महत्त्वाच्या संस्थांच्या मुख्य पदावर नियुक्ती झाली आहे. या अगोदर संजय मल्होत्रा यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदावर नियुक्त झाले होते.
पांडे हे 1987 च्या ओरिसा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी बराच काळ निर्गुंतवणूक सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कोसळत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यापासून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. अशा परिस्थितीत बाजार नियंत्रक म्हणून पांडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पांडे यांनी महत्त्वाची जबाबदारी उचलली आहे. या अर्थसंकल्पामध प्राप्ती कर उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर नवे प्राप्तिकर विधेयक तयार करण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचे समजले जाते.




