SEBI : सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांचा कार्यकाळ संपुष्टात; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, साधा फेअरवेलही दिला नाही; कारण काय?

मुंबईः सेबीच्या अध्यक्षपदी असलेल्या माधवी पूरी बुच यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यांना आता पदावर पायउतार व्हावे लागले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती केली आहे. माधवी पूरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी २ मार्च २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांचा कर्मचाऱ्यांनी फेअरवेल देखील केला नाही. यामुळे अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहेत. माधव पुरी बुच यांना कधी वाटलेही नसेल की अॅाफिसचा शेवटचा दिवस असा असेल. याची आता सर्व स्तरातून चर्चा केली जात आहे.
सेबी ऑफिसच्या परंपरेनुसार, कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या चेअरपर्सनला फेअरवेल देण्यात येते. मात्र माधवी पुरी बुच यांच्या शेवटच्या दिवशी ऑफिसमधील वातावरण एकदम वेगळे होते. कर्मचाऱ्यांमध्ये आनंद होता असे सांगितले जाते. बूच कार्यालयात त्यांच्या शेवटच्या दिवशी आल्याच नाहीत, अशी माहिती मिळत आहे. त्यांचा निरोप समारंभ न घेतल्याचे कारण म्हणजे सेबी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामामुळं नाराजी होती असे सांगितले जाते. या नाराजीचे कारण म्हणजे बूच यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना सेवेत बढती दिल्याचे सांगण्यात येते.
माधवी पुरी बुच यांचा शेवटच्या वर्षाच्या कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. सेबीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामाविरोधात सेबी कर्मचाऱ्यांच्या मुंबई अॅाफिसच्या बाहेर आंदोलन केले होते. तसेच माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर परदेशी संस्थांमध्ये गुतंतवणूक केल्याचा आरोप देखील केला जात आहे.
कोण आहेत तुहिन कांत पांडे ?
पांडे ओडिशा केडरचे 1987 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय (IAS) अधिकारी आहेत. त्यांना नुकत्याच झालेल्या फेरबदलात केंद्रीय अर्थसंकल्प 2025 पासून नवीन महसूल सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. महसूल सचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पांडे हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव होते. सरकारी निर्गुंतवणूक प्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा आहे. सरकारी कंपन्यांच्या भाग विक्रीबाबत अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.




