प्रचारादरम्यान गोविंदाची प्रकृती खालावली; रॅली अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय नेतेमंडळींसह सेलिब्रिटीही प्रचारात गुंतल्याचे दिसत आहे. अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता. पाचोरा येथे गोविंदाला गोळी लागलेला पाय दुखू लागला. पाय दुखण्यासह त्याला छातीत अस्वस्थ जाणवू लागले. यानंतर त्याने रोड शो अर्धवट सोडून त्याने मुंबईकडे परतणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात शनिवारी मुक्ताईनगर, बोडवड, पाचोरा, चोपडा या ठिकाणी गोविंदा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी पोहोचला होता. गोविंदा पाचोरा येथे पोहोचल्यानंतर त्याच भव्य स्वागत करून त्यांचा रोड शो सुरू करण्यात आला. पण, यानंतर काही वेळातच गोविंदाला अस्वस्थ वाटू लागले. यासोबत गोविंदाच्या गोळी लागून दुखापत झालेल्या पायामध्येही वेदना होऊ लागल्या.
यानंतर आपण खबरदारी म्हणून आपला दौरा रद्द करत असल्याची प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहा आणि महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना विजय करा, असे आवाहन करत गोविंदा मुंबईकडे रवाना झाला.





