पुणे जिल्हा | जेजुरीत घुमला गोंविदा रे गोपाळाचा गजर

जेजुरी, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये विविध मंडळांनी चार दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. चारही दहीहंड्या बारामतीच्या गोविंदा पथकांनी फोडल्या.
शाहीर सगनभाऊ दहीहंडी उत्सव मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका चौकात आयोजित करण्यात आलेली दहीहंडी बारामतीच्या उमाजीराजे नाईक दहीहंडी संघाने या पथकाने फोडली.
मनसेच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित जेजुरी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सतीश घाडगे, आकाश जगताप, मंजुश्री हरपूडकर, दिपिका कुरतडकर, जनक जावरे आदींना सन्मानित करण्यात आले.
अस्तित्व गुरुकुल विद्यालय वीर येथील अनाथ मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी करून घेत नवे कपडे, धान्य व शालेय साहित्याचे वाटप केले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय जगताप, देवसंस्थान माजी विश्वस्त संदीप जगताप आदी उपस्थित होते. उत्सवाचे आयोजन मनसे तालुकाध्यक्ष उमेश जगताप ,अमोल कुदळे यांनी केले होते.
शिवसेवा मंडळाचे अध्यक्ष किरण दावलकर मित्र परिवाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. बारामतीच्या गोविंदा पथकाने फोडलेल्या दहीहंडीला उपस्थितांचे हस्ते पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
माजी नगरसेवक अमोल सातभाई आयोजित कै.राजेंद्र सातभाई प्रतिष्ठानच्या वतीने धालेवाडी रस्त्यावरील पालखी तळावर दहीहंडी उत्सवाच्या वतीने उभारण्यात आलेली दहीहंडी श्री शिवछत्रपती दहीहंडी संघ माळेगाव बारामती या पथकाने फोडली तर जय मल्हार चौकातही टायगर ग्रुपच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व दहीहंडी कार्यक्रमांना आमदार संजय जगताप यांनी उपस्थिती दर्शवली.





