Jejuri : जेजुरीतील कडेपठारावरील डोंगररांगेत फटाक्यांमुळे वणवा
Jejuri : या डोंगररांगेमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव व पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. फटाक्यांमुळे लागणाऱ्या अशा वणव्यांमुळे येथील जैवविविधता व प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, दसऱ्याच्या रात्री दोन्ही पालख्यांच्या पारंपरिक देवभेट सोहळ्याच्या वेळी कड्यावर व डोंगरदरीत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाळलेल्या गवताने व झाडांनी अचानक पेट घेतला. वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे हा वणवा विझवण्यात यश आले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या डोंगररांगेमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव व पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. फटाक्यांमुळे लागणाऱ्या अशा वणव्यांमुळे येथील जैवविविधता व प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
फटाक्यांची आतषबाजी भाविकांचे लक्ष वेधून घेत असली तरी हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न अनेकांनी खाजगीत उपस्थित केला. फटाक्यांच्या आवाजामुळे दगडी बांधकाम, दीपमाळा, सज्जा, छोटी देवकुळे यांना हादरे बसतात व दगडी बांधकाम कमकुवत होते. यामुळे मागील २५ वर्षांपूर्वीच तत्कालीन विश्वस्त मंडळाने गडकोट आवारात फटाके वाजविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर, विश्वस्त मंडळाने मंत्रिमंडळ व पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत जीर्ण होत असलेल्या गडकोट, पायरीमार्ग मुख्य मंदिर, दीपमाळा, वेशी यांचे स्टेक्चरल ऑडिट तयार करत शासनाकडून दुरुस्ती व विकासकामांसाठी निधी मंजूर केला. पुरातत्व खात्याने जेजुरीचा पुरातन खंडोबा गड संरक्षित म्हणून घोषित केला आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश पायमल्ली
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिका क्र.१/२०२६ मध्ये २२ सप्टेंबर व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी फटाके वाजविण्या संदर्भात ११ नियमावलीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी तसेच जैव व नैसर्गिक वित्तीय हानी होईल, अशा ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने सुद्धा वर्तमान पत्रातून जाहीर प्रगटन केले आहे. मात्र, न्यायालयाने नियुक्त केलेल्या अथवा त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक न्यासाकडूनच नियमांची पायमल्ली होत असेल तर बोलायचे कुणाला ? असा प्रश्न निर्माण होतो .
बाहेरगावचे काही भाविक देवभेट सोहळा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी या ठिकाणी शोभेची दारू उडवली; मात्र त्यांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अनुभव नसल्याने गवताला आग लागून वणवा पेटला. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणली, तरीही अग्निशामक दलाचे वाहन वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. देवस्थानला गडावर व परिसरात फटाके न फोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, वनविभागाच्या जागेत लागलेल्या या वणव्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– धनंजय देवकर, वनरक्षक, जेजुरी





