CM सिद्धरामय्यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी दिली मंजुरी; काय आहे ‘मुडा’ भ्रष्टाचार प्रकरण?

MUDA land Scam Case | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याची राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते टीजे अब्राहम यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापूर्वी मुडा प्रकरणात राज्यपालांनी नुकतीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.
तक्रारदारांनी मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते टीजे अब्राहम आणि इतर अनेक तक्रारदारांनी मुडा घोटाळ्यातील बेकायदेशीर वाटपामुळे राज्याचे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोप केला. या तक्रारीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुडा आयुक्त यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. MUDA land Scam Case |
काय आहे ‘मुडा’ प्रकरण?
म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण अर्थात MUDA ही कर्नाटकची राज्यस्तरीय विकास संस्था आहे. शहरी विकासाला चालना देणे आणि दर्जेदार पायाभूत सुविधा विकसित करणे हे या एजन्सीचे काम आहे. तसेच ही संस्था नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देते. मुडाने शहरी विकासादरम्यान ज्या लोकांना जमीन गमावली त्यांच्यासाठी एक योजना आणली.
50:50 नावाच्या या योजनेत जमीन गमावलेल्या लोकांना विकसित जमिनीच्या 50% वाटा मिळण्याचा हक्क होता. ही योजना 2009 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आली. जी 2020 मध्ये तक्रारीनंतर बंद करण्यात आली होती. योजना बंद झाल्यानंतरही मुडाने 50:50 योजनेंतर्गत जमिनी संपादित करून वाटप सुरूच ठेवल्याचा आरोप होत आहे.
सिद्धरामय्या यांच्या पत्नीवरही आरोप
अहवालानुसार, या योजनेत अनेक उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. व्यक्तींना या योजनेंतर्गत दिलेल्या जमिनीपेक्षा अधिक पर्यायी जागा देण्यात आल्या. या योजनेत रिअल इस्टेट एजंटांना जमिनी दिल्याचाही आरोप आहे. सीएम सिद्धरामय्या यांच्यासोबत त्यांच्या पत्नीवरही आरोप आहेत. सिद्धरामय्या यांच्या पत्नीची म्हैसूरच्या एका पॉश भागात जमीन होती जमिनीच्या बदल्यात त्यांना भूखंड देण्यात आला. MUDA land Scam Case |
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती यांना दिलेल्या जमिनीची किंमत त्यांच्याकडून MUDA ने घेतलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पार्वती सिद्धरामय्या यांची मूळतः म्हैसूरच्या केसरे गावात सुमारे 3 एकर जमीन होती, जी त्यांना तिचा भाऊ मल्लिकार्जुन यांनी भेट म्हणून दिली होती. ही जमीन MUDA ने विकासासाठी अधिग्रहित केली होती आणि 2021 मध्ये त्यांना दक्षिण म्हैसूरमधील एक प्रमुख परिसर विजयनगर येथे 38,283-चौरस फूट जागा देण्यात आली होती.
हेही वाचा:





