गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

पुणे – राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे नुकतेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी गडकिल्ल्यांना न्याय मिळेल अशी आशा आता वाटू लागली आहे. मुनगंटीवर यांनी किल्ले जतन, संवर्धन आणि व्यवस्थापनासंबंधी बैठक नुकतीच घेतली. या बैठकीला आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव “युनेस्को’ला देण्यात आले आहेत. जागतिक इतिहासाच्या पटावर या किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व युनेस्कोला पटवून देण्याचे काम राज्य पुरातत्व विभाग करत असल्याची माहिती पुरातत्व संचालक डॉ. गर्गे यांनी दिली. या आधीही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेळोवेळी निधीची मागणी केली होती. तत्कालीन फडणवीस सरकारने समिती स्थापन करून रायगडासाठी विशेष निधी मंजूर केला होता. त्यानंतर साडेतीनशे कोटी रुपये आणि महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यासाठी साडेतीनशे कोटी असे सातशे कोटी असा भरगच्च निधी या कार्यासाठी मिळाला आहे. त्यामुळे आता तरी या गडकिल्ल्यांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आजपर्यंत पैसे मिळत नव्हते; आता तेवढे तरी मिळत आहेत. सरकारला सर्व अन्य सरकारी कामे प्राधान्याने करावी लागतात ती करताना गडकोट किल्ले स्मारकांच्या जतनासाठीही काम करावे लागते. सिंहगडाचे महत्त्व मोठे आहे, म्हणून तीन कोटी रुपये त्याच्यासाठी आता दिले आहेत. त्या आधीही दिले आहेत. गडकिल्ल्यांसाठी एकूण सातशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच इतकी रक्कम दिली गेली आहे. म्हणून त्याचे स्वागत आहे, असे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले.
जगातील पुरातत्त्व आणि वास्तुसंवर्धन तज्ज्ञांची परिषद
किल्ले संवर्धन योजनेतील सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही (सीएसआर फंड) मदत घेण्याचा निर्णय झाला असून, या उपक्रमात देशभरातील विविध नामांकित उद्योजकांचे सहकार्य घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीत मुनगंटीवार यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी जगभरातील नामांकित वास्तुसंवर्धन आणि पुरातत्त्व तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात येणार आहे.





