Sudhir Mungantiwar : मुनगंंटीवार यांचा सर्वात मोठा दावा; काँग्रेसची चिंता वाढवणार? चंद्रपुरात नाट्यमय घडामोडी
Sudhir Mungantiwar : चंद्रपुरात महापौर उपमहापौर पदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद होता आता हा वाद मिटला असून, अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे.

Sudhir Mungantiwar : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीनंतर महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही २९ पैकी अनेक महापालिकांवर महापौर उपमहापौर निवडणुकीवरून बराच खल सुरू आहे. या सगळ्यात चंद्रपूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदावरून होणाऱ्या मोठ्या घडामोडींमुळे ती राज्यात चर्चेत आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये असलेला वाद मिटवण्यात पक्षाच्या हायकंमाडला यश आले आहे. काँग्रेसचा महापौर पालिकेवर बसेल असा दावा केला जात आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा करत स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
“चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर बसणार”, असा मोठा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. “आमचं गणित सुटावं म्हणून काँग्रेसचे मित्र प्रयत्न करत आहेत. आमची कोणासोबतही चर्चा नाही, पण समोरच्यांची आमच्यासोबत चर्चा सुरु आहे. ११ तारखेला कोणासोबत चर्चा झाली हे नक्की सांगू”, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यांच्या दाव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
वडेट्टीवार काय म्हणाले?
चंद्रपुर महापालिकेत काँग्रेस पक्षाचाच महापौर होईल, पण तो खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मर्जीतला असेल. काँग्रेस हायकमांडने राजेश अडूर यांची गटनेतापदासाठी निवड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत दोन्ही गटांसोबत बैठक घेत हा वाद मिटवला आहे. यानंतर आता दोन्ही गटांनी एकत्र येत गटनोंदणी देखील केली आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आलेले आहेत. ठाकरे गट आपल्याला सहकार्य करणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीत काय घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





